श्रीनगर - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर सैरभैर झालेला पाकिस्तान काश्मीर खोऱ्यात दहशत माजविण्यासाठी प्रयत्न करत आहे. लष्कराने बुधवारी पाकिस्तानच्या नापाक हरकतीचा पुन्हा एकदा पुरावा जगासमोर आणला आहे. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडून त्यांच्याकडून कबुलीजबाब नोंदवून व्हिडीओ काढला. हे दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोएबाशी संबंधित आहेत.
भारतीय लष्काराचे चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल केजेएस ढिल्लो यांनी पत्रकार परिषदेत घेत सांगितले की, पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्यासाठी जास्तीत जास्त दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याच्या प्रयत्नात आहेत. 21 ऑगस्टला लष्कराने या दोन दहशतवाद्यांनी पकडले आहे. हे पाकिस्तानमधील लष्कर ए तोएबाचे दहशतवादी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
लष्कराने या दहशतवाद्यांना पकडलं असून त्यांचे व्हिडीओ बनविले आहेत. ज्यात ते कबूल करत आहेत की, ते पाकिस्तान आणि लष्कर ए तोएबाशी संबंधित आहेत. एका दहशतवाद्याचे नाव मोहम्मद अजीम आहे. त्याने सांगितले की, तो पाकिस्तानच्या रावलपिंडीवरून आला आहे आणि लष्कर ए तोएबासाठी काम करतो. भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी चहा दिला. कबुलीजबाब नोंदविल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की, चहा कसा आहे? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, चहा चांगला आहे.
पाकिस्तानी F-16 विमानाचा पाठलाग करताना विंग कमांडर अभिनंदनला कैद करणाऱ्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने अभिनंदनला हाच प्रश्न केला होता. त्यामुळे भारतीय लष्करानेही त्याच शिताफीने त्यांच्या स्टाइलमध्ये या दहशतवाद्यांना प्रश्न विचारले. या व्हिडीओ दुसरा दहशतवादी म्हणतो की, तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गाजी आबाद शहरातील रहिवाशी आहे. काश्मीर खोऱ्यात कोणत्याही हिंसाचारात एकाही व्यक्तीचा मृत्यू सुरक्षा यंत्रणांच्या हातून झाला नाही. खोऱ्यात झालेल्या मृत्युंना दहशतवादी आणि दगडफेक करणारे जबाबदार आहेत असं लष्कराने सांगितले.
याशिवाय लष्करात भरतीसाठी आलेल्या रॅलीला संबोधित करताना ढिल्लो यांनी सांगितले की, मी भविष्यात तुमच्या सोबत काम करू इच्छितो. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करावा, ड्रग्स आणि बंदूक यांच्यापासून दूर राहावं. तुमच्या पालकांना तुमच्यावर अभिमान असला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.