ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - सरहद्दीवर पाकिस्तान आणि चीनकडून सातत्याने कुरापती सुरू आहेत. सरकारही देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे दावे करत आहे. मात्र दुसरीकडे भारतीय लष्कराकडे दहा दिवस लढण्याइतपतही दारूगोळा नसल्याचे समोर आले आहे. सरकारी खात्यांचे ऑडीट करणारी संस्था कॅगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
कॅगने आज संसदेच्या पटलावर ठेवलेल्या अहवालात सांगितले की, "लष्करी मुख्यालयाने 2009 ते 2013 च्या दरम्यान खरेदीच्या ज्या व्यवहारांची सुरुवात केली. त्यातील अनेक व्यवहार जानेवारी 2017 पर्यंत बारगळलेले होते. 2013 पासून ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून पुरवण्यात येणाऱ्या दारू गोळ्याची गुणवत्ता आणि प्रमाण अपूरे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. परतवण्यात आलेला, निरुपयोगी दारुगोळा हटवण्याबाबत तसेच दुरुस्त करण्याबाबतही हेच धोरण कायम राहिले. दारू गोळ्याच्या गोदामात अग्निशमन कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे अपघातांचा धोका आहे. "
या अहवालानुसार यावर्षी जानेवारी महिन्यात लष्कराच्या दारुगोळ्याच्या व्यवस्थापनाचे ऑडीट करण्यात आले होते. लष्कराकडे गरजेनुसार राखीव दारुगोळा ठेवला जातो. संरक्षण मंत्रालयाने 1999 साली किमान 40 दिवस पुरेल एवढा राखीव दारुगोळा ठेवण्यास मंजुरी दिली होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या आढाव्यात केवळ 20 टक्के दारुगोळाच 40 दिवसांच्या कसोटीवर उतरला होता.