काश्मीरमध्ये तैनात जवानाच्या मृत्यूनंतर पत्नीचा गळफास; लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:40 PM2021-08-12T12:40:44+5:302021-08-12T12:42:20+5:30
कोतवाली देहात गावात बिजोरी रहिवासी जवान अरविंद चौहान लष्कारात नोकरी करत होता.
एटा - उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात सैनिक पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचाही जीव गेला आहे. माहेरी असणाऱ्या पत्नीचा मृतदेह गुरुवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
कोतवाली देहात गावात बिजोरी रहिवासी जवान अरविंद चौहान लष्कारात नोकरी करत होता. काश्मीरमध्ये अरविंद तैनात होता. ६ ऑगस्टला लष्कराच्या शिबिरात त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. अरविंद आणि पत्नी आरती यांच्यात काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळेच पत्नीने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
सहा दिवसांनी पत्नीचाही जीव गेला
पतीच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी पत्नी आरतीनेही गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद आणि आरतीचं लग्न २९ जानेवारी २०१९ रोजी झालं होतं. मागील काही महिन्यापासून दोघांमध्ये वादविवाद सुरू होते. त्यामुळे आरतीनं माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. अरविंद चौहानचा मृतदेह १० ऑगस्टला काश्मीरहून एटाला आणला होता. याठिकाणी बिजोरी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी आरती पती अरविंदचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पोहचली होती. परंतु अरविंदच्या कुटुंबाने आरतीला त्यांचा मृतदेह पाहायलाही दिला नाही. त्यामुळे आरती खूप दु:खी होती. अरविंद चौहान पाच वर्षापूर्वी लष्करात शिपाई पदावर भरती झाला होता. त्यांचा मोठा भाऊही सैन्यात आहे. ते सध्या अहमदनगर येथे तैनात आहेत. वडील अरुण चौहान लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. घरगुती वादातून एका आठवड्यात पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.
अरविंद चौहानच्या मृत्यूच कारण अस्पष्ट
शुक्रवारी राजौरी क्षेत्रात चकमक सुरु असताना लष्कराकडून अरविंदच्या घरच्यांना फोन आला की अरविंदचा मृत्यू झाला आहे. चकमकीत अरविंद शहीद झाला असं त्याच्या कुटुंबियांना वाटलं. परंतु लष्कराने चकमकीचा कोणताही उल्लेख केला नाही. सोमवारपर्यंत लष्कराकडून अरविंदच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट होतं असं त्याचे वडील म्हणाले. माझा मुलगा खूप शौर्यवान होता. देशाच्या सेवेसोबत त्याच्या मनात शिक्षणाचीही आवड होती. एकेदिवशी त्याने मला काही डॉक्यूमेंट्स मागितले होते. त्याला बीएससी पदवी घ्यायची होती. लष्करात भरती झाल्यानंतर बीएससीच्या दुसऱ्या वर्षापासून त्याचे शिक्षण बंद झाले असं अरुण चौहान यांनी सांगितले.