नवी दिल्ली : कोरोना साथीवर मात करणे हे एक प्रकारचे युद्धच असून ते आपल्याला जिंकायचे आहे. त्यासाठी सुरू होणाऱ्या मोहिमेला ‘को-जीत’ असे नाव देण्यात आले आहे, असे सैन्यदलांतील इंटिग्रेटेड स्टाफच्या उपप्रमुख (वैद्यकीय विभाग) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले.देशातील लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने राबविण्यासाठी तसेच विविध राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा तसेच वैद्यकीय मदत देण्यासाठी लष्कराने एक आराखडा तयार केला आहे, अशी माहितीही कानिटकर यांनी दिली. ऑक्सिजनचे रिकामे टँकर विविध राज्यांत लवकर पोहोचविण्यासाठी लष्कर मदत करणार आहे. त्यामुळे या टँकरचा वाहतुकीचा वेळ वाचेल.
राज्य सरकारशी चर्चा करून पावले उचलणारn कोरोना रुग्णांवरील उपचार व अन्य वैद्यकीय मदत करण्याकरिता प्रत्येक विभागातील मिलिटरी कमांडर किंवा वरिष्ठ लष्करी अधिकारी राज्य सरकारशी चर्चा करून त्याप्रमाणे पावले उचलतील. n माधुरी कानिटकर म्हणाल्या की, कोरोना साथीवर मात करण्यासाठी तीनही सैन्यदले आता कामाला लागली आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या लोकांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी लष्कर राज्य सरकारला मदत करणार आहे. n जिथे रुग्णशय्यांची संख्या अपुरी असेल तिथे ती वाढविण्याचाही प्रयत्न केला जाईल.
विविध लष्करी रुग्णालयांत कोरोनाबाधित नागरिकांवर उपचारांची सोय करण्यात आली आहे. लष्करी साधनसामग्री ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणारे रेल्वेचे डबे आता ऑक्सिजनची वाहतूक करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच लष्करातील वैद्यकीय कर्मचारीही कोरोनाग्रस्त नागरिकांवर उपचार करणार आहेत. - माधुरी कानिटकर, लेफ्टनंट जनरल
ऑक्सिजनसाठी लष्कराचे २०० ट्रक ड्रायव्हर सेवा बजावणारn ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लष्करातील २०० ट्रक ड्रायव्हर जवान सेवा बजावणार आहेत. हवाई दलाच्या विमानांनी सिंगापूर, दुबई आदी देशांतून भारतात ऑक्सिजन टँकर आणले आहेत. n कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी लष्कराकडून सर्व साहाय्य करण्यात येईल, असे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच एका बैठकीत सांगितले होते.