निनाद देशमुखपुणे : दहशतवाद, सातत्याने लादला जाणारा कर्फ्यू यामुळे काश्मिरी नागरिक आधीच त्रस्त होता. त्यात ३७० कलम रद्द करीत काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. या निर्णयाने वेगाने विकास होईल, अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, वर्षाच्या सुरुवातीला कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊन यामुळे काहीही होऊ शकलेले नाही. उलट अनेक समस्यांमध्ये भर पडत गेल्याने येथील तरुणांमध्ये नाराजी आहे.
५ आॅगस्ट २०१९ ला केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरचे विभाजन करीत दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. हा निर्णय घेताना येथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, उद्योगधंदे येतील, दहशतवाद संपेल, फुटीरतावादी वृत्तींना आळा बसेल, असे सांगण्यात आले होते. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षात ना रोजगार आले ना प्रगतीची अन्य चिन्हे दिसून आली. कुपवाडा जिल्ह्यातील बी.कॉम.पर्यंत शिकलेला जहीद अजीज शेख सध्या कंत्राटदार आहे. मात्र, गेल्या वर्षभरात नव्या निर्बंधांमुळे त्याला कुठलेही नवे कंत्राट मिळालेले नाही. शिवाय अनेक शासकीय कंत्राटांची आधीची बिलेही थकली आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बेरोजगार तरुण दहशतवाद्यांकडे तरुण आकर्षित होत आहेत. राज्य दर्जा असतानाही या समस्या अशाच होत्या. पूर्वी लोक त्यांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे मांडू शकत; परंतु आज तो अधिकारही त्यांच्याकडे राहिलेला नाही.नाशिक येथे होमिओपॅथीचे शिक्षण घेत असलेली आणि मूळची अनंतनाग जिल्ह्यातील असलेली नादिया शेख म्हणाली, केंद्रशासित प्रदेश बनल्याने विकास होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरुवातीला असलेल्या बंदमुळे आणि कोरोना लॉकडाऊनमुळे प्रशासनाला अनेक मर्यादा आल्या असतील. येत्या काळात नक्कीच यात बदल होईल. बी.एस्सी. आणि सिव्हिल इंजिनिअर असलेला कुपवाडा येथील शौकत अहमद मीर म्हणाला की, नागरिकांना रोजगार असेल, तर त्यांना अन्य गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे प्राधान्याने रोजगारनिर्मिती करायला हवी. सध्या कोरोनामुळे सर्व बंद आहे. कामे नसल्याने विरोधाचा सूर वाढतो आहे.दहशतवाद्यांच्या घटनेत वाढवर्षभरात अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. लष्कर आणि पोलिसांतर्फे या कारवाया करण्यात आल्या. सुरक्षारक्षकांना यात यश आले असले तरी दहशतवाद हा दिवसेंदिवस वाढतच आहे.पर्यटनही बंददेशाचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षभरापासून बंद आहे. यामुळे याठिकाणी बेरोजगारी वाढली आहे.वाट पाहावी लागेलपाकिस्तानला थेट युद्धात भारताला हरवणे कठीण असल्याने त्यांनी दहशवादाचा स्वीकार केला. येथील तरुणांना दहशतवादी प्रवृत्तींपासून परावृत्त करणे गरजेचे आहे. केंद्रशासित प्रदेशामुळे विकासाला वाव आहे. एका वर्षात याचे परिणाम दिसतील, असे म्हणणे योग्य होणार नाही. विकासासाठी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.-अता हसनेन,निवृत्त लेफ्टनंट जनरल