नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील अजिबात काहीच कळत नाही. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी असताना, ते मात्र आपण पाचव्या स्थानी असल्याचे सांगत फिरत आहेत. त्यांच्याच सांगण्यावरून पंतप्रधान मोदीही तसे बोलत आहेत, अशी टीका भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भाजपाला घरचा अहेरच दिला. जेटली यांची अक्कलच त्यांनी काढली. तुम्ही अर्थमंत्री झालात तर काय कराल, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी उत्तरले की, प्राप्तिकर नावाचा प्रकारच मी बंद करेन. भ्रष्टाचाराचे कारण प्राप्तिकरच आहे. तोच संपवून टाकायला हवा. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही असाल का, या प्रश्नावर ते म्हणाले की, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, पण मी मंत्री झालो तर माझ्या खात्यात मी कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही.मी चंद्रशेखर व नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे मंत्रिपद मला काही नवीन नाहीे. भारतीय मुस्लीम यांना मी काही समस्या मानत नाही. केरळ, तामिळनाडूमधील मुस्लीम समाज शिकलेला आहे. त्यामुळे तिथे ते आपल्या कुटुंबाचे नियोजन करतात, मुले किती असावीत, हे ठरवतात.चौकीदार नाही; मी ब्राह्मण आहेस्वामी यांनी भाजपाच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वत:च्या नावापुढे चौकीदार असे लावण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की, मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कधीच चौकीदार असू शकत नाही. मी चौकीदाराला अमूक एक काम करायला सांगतो. त्याच्याकडून मी कामे करवून घेतो. त्यामुळे स्वत:ला कधीही चौकीदार म्हणवून घेणार नाही. स्वामी यांनी त्या सर्वांना एका प्रकारे टोलाच लगावला आहे.
अरुण जेटली यांना अर्थशास्त्रच कळत नाही; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 5:35 AM