देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावल्याची माहिती एम्समधील सूत्रांनी दिली आहे. कार्डिओ-न्यूरो सेंटरमध्ये जेटलींवर उपचार सुरू आहेत. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतंच. त्यानंतर आता एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा-एओर्टिक बलून पंप (IABP) सपोर्टही द्यावा लागत असल्याचं समजतं.
श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले जात आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख नेतेमंडळी एम्समध्ये येऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एम्सला भेट दिली. एकीकडे वैद्यकीय उपचार सुरू असताना भाजपाचे कार्यकर्ते जेटलींच्या आरोग्यासाठी प्रार्थना, हवनही करत आहेत.