नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना व्हेंटिलेटरवरून आता एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा ऑटिर्क बलून सपोर्ट (IABP) सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. ही पायरी व्हेंटिलेटरच्या पुढची मानली जाते. त्यामुळेच अरुण जेटलींची प्रकृती आणखी खालावल्याचं सांगितलं जातंय. गेल्या 10 दिवसांपासून जेटली हे नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या प्रकृतीत कुठलिही सुधारणा नसल्याचं समजतंय.
श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ते सर्व उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख नेतेमंडळी एम्समध्ये येऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करून आलेत. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एम्सला भेट दिली. एकीकडे वैद्यकीय उपचार सुरू असताना भाजपाचे कार्यकर्ते आणि सर्वच हितचिंतक जेटलींच्या आरोग्यासाठी प्रार्थना, हवनही करत आहेत. तसेच, देशभरातून भाजपा कार्यकर्ते आणि जेटलींचे चाहते त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी देवाचा धावा करत आहेत.
दरम्यान, एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन ही अत्यंत अद्ययावत लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. ही यंत्रणा रुग्णाच्या शरीरातील रक्त काढते, त्यातील कार्बनडाय ऑक्साईड बाजूला करून हे रक्त 'ऑक्सिजनेट' केलं जातं आणि पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडलं जातं. हृदय आणि फुफ्फुसाची क्रिया जेव्हा योग्य रितीने होत नसते आणि व्हेंटिलेटरचाही तितकासा उपयोग नसतो, त्यावेळी ECMO चा आधार घेतला जातो.