Arun Jaitley Health: अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 06:40 AM2019-08-17T06:40:28+5:302019-08-17T06:40:44+5:30
Arun Jaitley Health: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी एम्सला भेट देऊन माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी एम्सला भेट देऊन माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा तेथे जाऊन विचारपूस केली. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ९ आॅगस्टपासून उपचार घेत असलेले जेटली यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रपतींच्या भेटीच्या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, या खात्याचे राज्यमंत्री अश्विनी चौबे हेही उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, जेटली यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. जेटलींना दाखल केल्यापासून एम्स रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीची अधिकृत माहिती दिलेली नाही. ती माहिती आज दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र संध्याकाळपर्यंत रुग्णालयाने ती दिली नाही. अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच श्वसनास त्रास झाल्याने जेटली यांना ९ आॅगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊ न जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. गेल्या शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एम्सला भेट दिली होती.