चंदिगड - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्या मागितलेल्या माफीवरून पंजाबच्या राजकारणात वादळ आले आहे. एकीकडे आपच्या पंजाबमधील कार्यकारिणीकडून केजरीवाल यांच्या माफीनाम्याला तीव्र विरोध होत आहे. तर काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनीही माफीनाम्यावरून केजरीवाल यांना टोला लगावला आहे. मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल हे घाबरट असल्याचा टोला केजरीवाल यांनी लागावला आहे. अरविंद केजरीवाल यांनी मजिठिया यांच्यावर ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. मात्र त्या केरजीवाल यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या मजिठिया यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. अखेर केजरीवाल यांनी मजिठिया यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केजरीवालांवर खोचक शब्दात टीका केली आहे. "मजिठियांची माफी मागून केजरीवाल यांनी घाबरटपणा दाखवला आहे. ही पंजाबमधील जनतेची फसवणूक आहे. केजरीवाल यांनी असे करून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची हत्या केली आहे. आता ते पंजाबमध्ये कोणत्या तोंडाने अमली पदार्थांविरोधात बोलणार आहेत," असा सवाल सिद्धू यांनी केला आहे.
मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल घाबरट, सिद्धूंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 5:13 PM