विरोधकांच्या महाबैठकीत अरविंद केजरीवाल-उमर अब्दुल्ला भिडले; ठाकरे-पवारांची मध्यस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 04:20 PM2023-06-23T16:20:21+5:302023-06-23T16:21:42+5:30
बैठकीत विरोधक एकमेकांना भिडताना पाहून शरद पवार, उद्धव ठाकरे पुढे आले.
पाटणा - देशात भाजपाविरोधकांची एकजूट होण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सुरुवातच होताच काही विरोधी पक्ष एकमेकांना भिडले. सूत्रांनुसार, या बैठकीला सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यात काही मुद्द्यांवरून वाद पाहायला मिळाला. आपने विरोधकांच्या बैठकीतच काँग्रेसवर गंभीर आरोप लावला.
आपने सांगितले की, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात समझौता झाला आहे. जेव्हा दिल्ली सेवा अध्यादेश संसदेत आणलं जाईल तेव्हा काँग्रेस वॉकआऊट करणार. या अध्यादेशाविरोधात आपने सर्व राजकीय पक्षांचे समर्थन मागितले. आपच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कड म्हणाल्या की, राहुल गांधी आणि भाजपात समझौता झाला आहे. या असैविधानिक अध्यादेशाने दिल्लीतील लोकांचा आणि सरकारचा अधिकार काढून घेण्यात येणार आहे. काँग्रेस यावर भूमिका स्पष्ट का करत नाही? काँग्रेस संविधानासोबत आहे की भाजपासोबत हे स्पष्ट करावे.
उमर अब्दुल्ला यांनी घेतला आक्षेप
याच बैठकीत उमर अब्दुल्ला यांनी केजरीवालांना फटकारले. केजरीवाल या बैठकीत केंद्राकडून आणण्यात येणाऱ्या अध्यादेशाला आम्ही विरोध करतोय आणि बाकी पक्षांनी समर्थन करावे असं म्हणतात. केजरीवाल यांच्या या भूमिकेवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आक्षेप घेतला. जेव्हा जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले. तेव्हा तुमच्या पक्षाने आम्हाला समर्थन दिले नाही आणि संसदेत सरकारला पाठिंबा दिला असं त्यांनी सांगितले.
बैठकीत विरोधक एकमेकांना भिडताना पाहून शरद पवार, उद्धव ठाकरे पुढे आले. केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला तेव्हा पवार-ठाकरे यांनी मध्यस्थी केली. विरोधकांना एकत्र यावे लागेल. आपापसातील मतभेद दूर करावे लागतील. शरद पवार यांनी राष्ट्रवादी- ठाकरे यांचा संदर्भ देत म्हणाले की, आम्ही मागील २५ वर्षापासून एकमेकांवर टीका करतोय. परंतु मतभेद बाजूला ठेऊन आम्ही एकत्र काम करतोय तर आता वेळ आलीय मतभेद विसरून एकत्र येण्याची असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
विरोधकांच्या महाबैठकीला कोण उपस्थित?
पाटणातील या बैठकीला १५ पक्षांचे २७ नेते उपस्थित होते. त्यात नितीश कुमार(जेडीयू), ममता बॅनर्जी(तृणमूल), एमके स्टॅलिन(डिएमके), मल्लिकार्जुन खरगे(काँग्रेस), राहुल गांधी(काँग्रेस), अरविंद केजरीवाल(आप), हेमंत सोरेन(झामुमो), उद्धव ठाकरे(शिवसेना-ठाकरे) शरद पवार(एनसीपी), लालू प्रसाद यादव(राजद), भगवंत मान(आप), अखिलेश यादव(सपा), केसी वेणुगोपाळ(काँग्रेस), सुप्रिया सुळे(एनसीपी), प्रफुल पटेल(एनसीपी), मनोज झा(राजद), फिरहाद हकीम(एआयटीसी), राघव चड्डा(आप), संजय सिंह(आप), संजय राऊत(ठाकरे गट), ललन सिंह(जेडीयू), संजय झा(राजद), सीताराम येचुरी(सीपीआयएम), उमर अब्दुल्ला(नेका), टीआर बालू(डिएमके), मेहबुबा मुफ्ती(पीडीपी), आदित्य ठाकरे(ठाकरे गट) यासारखे अनेक नेते उपस्थित होते.