जयपूर : राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Jodhpur central jail) तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्यामुळे महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी आसाराम बापूला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर जेल प्रशासनाने पुढील उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. कोरोना संसर्गामुळे आसाराम बापूची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले आहे. (Asaram Bapu Shifted To Mahatma Gandhi Hospital From Jodhpur Central Jail For Treatment After Corona Symptoms)
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. सोमवारी 3 मे रोजी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 5 मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी करुन त्याला आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या कारागृहातील जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना कारागृहातील डिस्पेंसरीमध्ये आयसोलेट करण्यात आले होते.
याआधीही आसाराम बापूला रुग्णालयात दाखल केले होतेयाआधी 18 फेब्रुवारीला आसाराम बापूला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी दोन दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आसाराम बापूची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. या घटनेवेळी आसाराम बापूचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जेलच्या बाहेर जमले होते.