राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:09 AM2020-08-15T03:09:48+5:302020-08-15T06:52:23+5:30
सरकार तरले : भाजपचा डाव हाणून पाडला -काँग्रेस
जयपूर : अतिशय नाराज झालेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी अखेर पक्षामध्येच राहाण्याचा निर्णय घेतल्याने राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार यापुढेही टिकणार हे स्पष्ट झाले होते. त्या गोष्टीवर राजस्थानच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकून अशोक गेहलोत सरकारने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
२०० सदस्यसंख्या असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाचे १०७ आमदार असून या पक्षाच्या सरकारला मित्र पक्ष व अपक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजपचे ७२ आमदार आहेत. सचिन पायलट यांचे समर्थक असलेले १९ काँग्रेस आमदार पुन्हा आपल्या नेत्यासह पुन्हा पक्षाच्या छावणीत परतल्याने गेहलोत निश्चिंत झाले होते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते.
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारांना अस्थिर करण्याऱ्यांना आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकून धडा शिकविला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. ते म्हणाले की, भाजपने मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश या राज्यांत खूप कारस्थाने केली. तोच प्रयोग त्यांना राजस्थानमध्ये करून माझे सरकार उलथवायचे होते. पण त्या पक्षाचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे.
तर सचिन पायलट यांनी सांगितले की, विरोधकांनी उभे केलेले अनेक अडथळे पार करून अशोक गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यातून सर्वांचा काँग्रेस पक्षावर व राज्य सरकारवर असलेला विश्वासही प्रकट झाला आहे. आम्ही उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू झाले आहेत असेही पायलट म्हणाले. सचिन पायलट समर्थक १९ आमदार पक्षातून फुटल्यास गेहलोत सरकारला धोका निर्माण झाला असता.
मतभेद न ताणण्याचा दाखविला शहाणपणा
विश्वासदर्शक ठरावावर मतदानाच्या आदल्या दिवशी गुरुवारी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची गुरुवारी बैठक आयोजिण्यात आली होती. त्याला अशोक गेहलोत यांच्यासमवेत सचिन पायलटही उपस्थित होते. त्याचवेळी हे सरकार तरणार अशी खूणगाठ सर्वांनी मनाशी बांधली होती. फक्त विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाचा सोपस्कार बाकी राहिला होता.
काँग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याशिवायही आम्ही बहुमत सिद्ध करू शकतो असे सूचक उद्गार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याआधी काढले होते. गेहलोत व पायलट गटाने मतभेद फार न ताणल्यामुळेच राजस्थानात सत्ता कायम राहिल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे.