ब्लॅक फंगसनंतर आता एस्परजिलियस लेंटुलस; दाेघांचा मृत्यू, औषधांचाही परिणाम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 08:01 AM2021-11-24T08:01:25+5:302021-11-24T08:02:24+5:30
काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकाेसिस किंवा ब्लॅक फंगसचा संसर्ग हाेत असल्याचे आढळून आले हाेते. आता एस्परजिलियस लेंटुलस या बुरशीचा संसर्ग आढळून आला आहे.
नवी दिल्ली : काेराेना महामारीची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच आणखी एका अदृश्य शत्रूने देशातील डाॅक्टरांचे टेन्शन वाढविले आहे. ‘एस्परजिलियस लेंटुलस’ नावाची ही बुरशी असून त्याच्या संसर्गामुळे दिल्लीत दाेन जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेचे कारण म्हणजे काेणत्याही औषधांना ही बुरशी जुमानत नाही. त्यामुळे एक नवेच संकट उभे ठाकले आहे.
काेराेनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकाेसिस किंवा ब्लॅक फंगसचा संसर्ग हाेत असल्याचे आढळून आले हाेते. आता एस्परजिलियस लेंटुलस या बुरशीचा संसर्ग आढळून आला आहे. ही बुरशी फुफ्फुसावर परिणाम करते. सर्वप्रथम २००५ मध्ये बुरशीची ओळख पटली हाेती. तेव्हापासून अनेक देशांमध्ये एस्परजिलियस लेंटुलसचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, भारतात या बुरशीचे रुग्ण प्रथमच आढळले आहेत. दिल्लीत इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्राेबायाेलाॅजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार या बुरशीमुळे मृत्युमुखी पडलेल्या एका रुग्णाचे वय ५० ते ६० वर्षे हाेते, तर दुसऱ्या रुग्णाचे वय ४५ वर्षांहून कमी हाेते. दाेघांनाही क्राेनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजचे निदान करण्यात आले हाेते.
एम्फाेटेरिसीन बी आणि ओरल व्हाॅरकाेनॅझाेल हे औषधे देण्यात आली. महिन्याभरानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही.