गुवाहाटी : आसाममध्ये नक्षलवाद्यांशी लढा देणाऱ्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. राज्यात बंदी घालण्यात आलेल्या आठ संघटनांच्या 644 नक्षलवाद्यांनी गुरूवारी 177 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.
उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनेच्या सदस्यांनी एका कार्यक्रमात आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करणे म्हणजे राज्य पोलिसांचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे. पोलीस महासंचालक ज्योती महंता यांनी पत्रकारांना सांगितले की, "राज्यासाठी आणि आसाम पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण दिवस आहे. आठ नक्षलवादी संघटनांच्या एकूण 644 कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आत्मसमर्पण केले आहे."
याचबरोबर, या नक्षलवाद्यांकडून जी शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत. यात एके-47, एके-56 यांसारख्या अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. आसामसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा पोलीस दलात समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे पोलीस महासंचालक ज्योती महंता यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आसामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.