नवी दिल्ली - देशातील 5 राज्यात सुरु असलेल्या निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदानही पार पडले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, मारहाणीच्याही घटना समोर येत आहेत. मात्र, आसामच्या पाथरकंडी विधानसभा क्षेत्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आली आहे. विशेष म्हणजे ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं सांगण्यात येतंय. यासंदर्भात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट केलंय.
आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. कारचा नंबर AS 10 B 0022 असून या कारमधील ईव्हीएम मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार असल्याचा दावा विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. काँग्रेस आणि एआययुडीएफने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं सांगत, निवडणूक आयोगाने तपास करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही ट्विट करुन भाजपावर आरोप केले आहेत.
एका पत्रकाराने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला असून प्रियंका गांधींनी तो रिट्विट केला आहे. दरवेळी निवडणुकांमध्ये खासगी गाड्यांमधून ईव्हीएम मशिनची रवानगी होताना आढळून येते. आश्चर्यांची बाब म्हणजे त्यामध्ये काही गोष्टी या कॉमन आढळतात.
भाजपा नेते किंवा त्यांच्या सहकाऱ्यांची ही गाडी असते. व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात येते. ज्यांनी हे व्हिडिओ जनतेसमोर आणले आहेत, त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपा मीडियाचा वापर करते.
असे आरोप प्रियंका गांधी यांनी केले आहेत.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह
बोलेरो कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळल्याचा व्हिडिओ ्व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाथरकंडी मतदारसंघात लोकं रात्री उशिरापर्यंत एकत्र जमले होते. तसेच, सोशल मीडियातूनही आयोगाला प्रश्न विचारत होते.