मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह आसाममधील (Assam) गुवाहाटीच्या (Guwahati)हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये मुक्कामाला आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांचे एक धक्कादायक विधान समोर आले आहे.
वृत्तसंस्था 'एएनआय'सोबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की नाही, हे मला माहीत नाही, असे हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचबरोबर हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकते. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचे बंड थंड करण्यासाठी व सरकार वाचविण्यासाठीचा शेवटचा प्रयत्न म्हणून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री व्हा, अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी ती धुडकावून लावल्याचे समजते. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असेल तर आपण राजीनामा द्यायला तयार आहोत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी म्हटले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ सोडा आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी अट ठेवली. आता सरकार टिकविण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी शिवसेनेने दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे.