नवी दिल्ली - आसाममध्ये सध्या पावसाने थैमान घातले आहे. आपत्ती निवारण आणि पोलीस दलाच्या मदतीने वेगाने बचावकार्य सुरू आहे. याच दरम्यान रविवारी रात्री उशीरा एक दुर्घटना घडली. नागाव जिल्ह्यातील पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. सोमवारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मुसळधार पावसामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
आसामचे पोलीस अधिकारी जीपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा पुराची माहिती मिळाल्यानंतर कामपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी सॅम्युजल काकोती चार पोलिसांसह बोटीने पाचोनिजार मधुपूर गावात पोहोचले. याच दरम्यान पोलीस कर्मचारी पुराच्या पाण्याने वाहणाऱ्या नदीत पडले आणि जोरदार प्रवाहात वाहून गेले. दोन पोलिसांची सुटका करण्यात आली, मात्र उर्वरित दोघांचा शोध लागू शकला नाही. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर दोन मृतदेह बाहेर काढले.
सोमवारी पहाटे पोलीस ठाणे प्रभारी काकोती यांचा मृतदेह अनेक तासांच्या शोधानंतर बाहेर काढण्यात आला. राजीव बोरदोलोई असं दुसऱ्या मृत्यू झालेल्या पोलिसाचं नाव आहे. सिंह म्हणाले की, आम्ही सर्व उपनिरीक्षक सॅम्युअल काकोती आणि कॉन्स्टेबल राजीव बोरदोलोई यांच्या धैर्याला आणि शौर्याला सलाम करतो. त्यांचे निस्वार्थी कृत्य आसामच्या पोलिसांच्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. ते म्हणाले की, या दु:खाच्या प्रसंगी आम्ही आमचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत आणि शूर पोलिसांनी दाखवलेल्या धैर्याला सलाम करतो.
नागाव जिल्ह्याला आसाममधील पुराचा मोठा फटका बसला आहे. कामपूरमधील कोपिली नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे 3,64,459 लोक बाधित झाले आहेत. 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 42,28,157 लोक बाधित झाले असून पुरामुळे 71 लोकांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आसाममधील एनडीआरएफच्या पहिल्या बटालियनचे कमांडर एचपीएस कंडारी यांनी एएनआयला सांगितले की, पुरामुळे संपूर्ण आसामला फटका बसला आहे. आमच्या सर्व 14 टीम तैनात आहेत, पण त्यांच्या व्यतिरिक्त आमच्याकडे बचाव कार्यात सहभागी असलेले लोकही आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आम्ही मुख्यालयातून वेगवेगळ्या ठिकाणी अतिरिक्त पथके पाठवली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,