गुवाहाटी : आसामध्ये राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या सर्व मदरसा आणि संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सुरु असणाऱ्या या धार्मिक शाळांचे येत्या काही महिन्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.
राज्य सरकार धार्मिक संस्थांना निधी देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व मदरसा आणि संस्कृत शाळांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांध्ये बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आसामचेशिक्षण मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले. तसेच, स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटनांकडून चालविण्यात येणारे मदरसे सुरू राहतील. मात्र, हे नियमांच्या चौकटीत असतील, असेही हेमंत विश्व शर्मा म्हणाले.
हेमंत विश्व शर्मा म्हणाले, "धार्मिक उद्देशांसाठी धर्म, धार्मिक शास्त्र, अरबी आणि इतर भाषांमध्ये शिकविण्याचे काम सरकारचे नाही. जर स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संघटना आपल्या पैशातून धर्माचे शिक्षण देत असेल, तर त्यामध्ये काहीच अडचण नाही. मात्र, हे सुद्धा नियमांच्या चौकटीत राहून करावे लागणार आहे.", याशिवाय, मदरशांमध्ये जर कुराण शिकविण्यासाठी राज्याचा निधी वापरला जात असेल, तर आपल्याला गीता आणि बायबल सुद्धा शिकवावे लागेल, असे हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, आसाम सरकारच्या मदरसा शिक्षा बोर्डच्या माहितीनुसार, राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणारे एकूण 612 मदरसे आहेत. या मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना इस्लामिक शिक्षण यासोबत विविध विषय शिकविले जातात. या मदरशांसोबत सरकारी अनुदानावर चालणाऱ्या जवळपास 101 संस्कृत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्कृत शाळांमध्ये वैदिक शिक्षणासोबत विविध विषयांचे शिक्षण दिले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बस अन् ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा 'तो' व्हिडीओ पाहून मन हेलावून गेलं- संभाजी राजे