आसामला महापुराचा तडाखा; पाच लाख लोक विस्थापित
By admin | Published: July 11, 2017 01:25 AM2017-07-11T01:25:30+5:302017-07-11T01:25:30+5:30
गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसामला महापुराला तडाखा बसला आहे
गुवाहाटी : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसामला महापुराला तडाखा बसला आहे. १५ जिल्ह्यांमध्ये पाण्याने हाहाकार केला असून, पाच लाख लोक विस्थापित झाले आहेत. २७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
ब्रह्मपुत्रा आणि बराक या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. त्याचा फटका ११०० गावांना बसला असून, १८ हजार लोकांना १८१ मदत छावण्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. ४१ हजार हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २ लाख जनावरांना या पुराचा फटका बसला आहे. छोट्या-मोठ्या रस्त्यांसह अनेक महामार्गही पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क गेल्या काही दिवसांपासून होऊ शकलेला नाही. पुढील काही दिवस आणखी जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
>मोठा फटका
ब्रह्मपुत्रा नदीने डिब्रूगड, निमतीघाट, बरौली आणि खुशियारा आदी भागांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. जियाभोरोली, दिखोव, चिरंग आणि बेकी ह्या नद्याही धोक्याच्या पातळीवर आहेत. काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यातही पाणी घुसले असून, तेथील वन्यजीवन धोक्यात आले आहे. येथे जगातील एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी एकतृतियांश गेंडे आहेत.