मोरीगाव : आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील निम्मी (नाव बदलले आहे) हिच्या डोळ्यांत आई झाल्याचा आनंद दिसत नाही, तर भीती, असुरक्षितता आणि भविष्यात येणाऱ्या अडचणींबद्दलची चिंता डोकावते. निम्मी त्या शेकडो बालवधूंपैकी एक आहेत. ज्यांच्या पतीला आसाम पोलिसांनी अटक केली आहे.
आसाममध्ये मागील दोन दिवसांपासून बालविवाहविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुरू असून, यात आतापर्यंत २,२५८ लोकांना अटक झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये हिंदू पुजारी आणि मुस्लीम मौलवींचाही समावेश आहे. पोलिसांनी ८ हजार आरोपींची यादी तयार केली आहे.
निम्मीने सांगितला घटनाक्रमगुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास दारावर टकटक झाली. आम्ही दरवाजा उघडला आणि बाहेर पोलिस दिसले. त्यांनी माझ्या पतीला सोबत घेतले, असे निम्मीने सांगितले. निम्मीच्या आवाजात असहायता होती. तिच्या मांडीवरील तिचा दीड महिन्याचा मुलगा रडत होता.
आधार कार्डमुळे घोळमाझ्या मुलाने लग्न केले तेव्हा सून लग्नासाठी योग्य वयाची होती; पण आधार कार्डवरील चुकीच्या तारखेमुळे माझा मुलगा तुरुंगात आहे. ती (सून) जन्मदाखला आणण्यासाठी माहेरी गेली आहे, असे रेजिना यांनी सांगितले. अनेक मुली लग्नाच्या वेळी अल्पवयीन नव्हत्या; परंतु आधार कार्डसाठी नावनोंदणी करताना चुकीची जन्मतारीख टाकली गेल्याचा दावा होत आहे.
भाजप मुस्लिमविराेधी : ओवेसीबालविवाहविरुद्धच्या कारवाईला विरोध सुरू झाला आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर टीका करत अटकसत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. पतींच्या अटकेनंतर विवाहित मुलींचे काय होणार? त्यांची काळजी घेण्यासाठी कोण असेल? आसाममध्ये भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे, असे ओवेसी म्हणाले.