- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : पुढील वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकात भाजपशी सामना करण्यासाठी काँग्रेस मवाळ हिंदुत्वाची भूमिका स्वीकारेल, असे दिसते.
या दोन्ही राज्यात तशी भूमिका घ्यावीच लागेल, असे काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते यांनाही वाटत आहे. पंजाबमध्ये मात्र आपले घर भक्कम ठेवण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागतील. तिथे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनाच मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि त्यांना पुढे केल्यास पंजाबमधील दलित मते काँग्रेसपासून दूर जातील. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे दलित आहेत.
उत्तर प्रदेश काँग्रेसची सारी सूत्रे प्रियांका गांधी यांच्या हाती आहेत. जात व धर्म यांच्यात विभागल्या गेलेल्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यापासून त्या मवाळ हिंदुत्वाची भूमिका सातत्याने घेत आहेत. वाराणशीच्या काशी विश्वनाथ मंदिरात जाणे, नवरात्रीचे उपवास करणे, गेल्या आठवड्यात एका मंदिरात देवीची आराधना करणे यातून ते स्पष्ट झालेच आहे. बसपा आणि समाजवादी पक्ष यांना कट्टर मते मिळणार नाहीत आणि आपण ती मिळवू, असे काँग्रेसचे गणित आहे. पण कट्टर व उच्चवर्गीय हिंदू मते भाजपपासून दूर जातील का, हे समाज भाजपवर खरोखर नाराज आहेत का, यावर सारी समीकरणे अवलंबून आहेत. उत्तराखंडातही काँग्रेसची हीच निवडणूक रणनीती असेल.