Corona Vaccine: देशात लवकरच लसीकरण सुरू होणार; जाणून घ्या, सीरमच्या लसीची किंमत किती असणार
By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 02:20 PM2020-12-31T14:20:11+5:302020-12-31T14:21:06+5:30
Corona Vaccine: देशात लवकरच कोरोना लसीकरणास सुरुवात होण्याची शक्यता
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २० ते २५ हजारांच्या आसपास आहे. तर कोरोनावर मात केलेल्यांची संख्या त्याहून अधिक आहे. देशाचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर मृत्यूदर १.४५ टक्के इतका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी गुजरातच्या राजकोटमधील एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी देश जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी सज्ज असल्याचं म्हटलं. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून कोरोना लसीला मंजुरी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ब्रिटन सरकारनं कालच ऑक्सफर्ड (Oxford) ऍस्ट्रा झेनेकाच्या (Astra Zeneca) लसीच्या वापरास परवानगी दिली. ब्रिटनच्या नियामक यंत्रणेकडून ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर भारतात या लसीच्या वापरास मंजुरी देण्याचा विचार मोदी सरकारकडून सुरू होता. आता ब्रिटननं ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाच्या लसीच्या वापरास परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारदेखील लसीच्या वापरास मंजुरी देऊ शकतं.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण आहे. मात्र ऑक्सफर्ड ऍस्ट्रा झेनेकाची लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर परिणामकारक ठरू शकणार आहे. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या डोजमध्ये अंतर आवश्यक आहे. दोन डोजमध्ये दोन महिन्यांचं अंतर राखल्यास लस परिणामकारक ठरू शकते.
कोरोना लसीच्या एका डोजची किंमत २०० रुपये आहे. त्यामुळे दोन डोजचा खर्च ४०० रुपये असेल. मात्र हा दर केवळ सरकारसाठी असेल, अशी माहिती सीरमनं दिली आहे. एखाद्या खासगी कंपनीनं लस खरेदी केल्यास त्यासाठी सीरम प्रति डोजमागे १ हजार रुपये आकारेल. कोविशील्ड लस मार्च-एप्रिल दरम्यान बाजारात उपलब्ध होईल.