लखनौ - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर,उत्तर प्रदेश एटीएसनं देवबंदमधून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाज अहमद तेली आणि आकिब अहमद मलिक अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघंही काश्मीरच्या कुलगाममधील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या दहशतवाद्यांना आपल्या कटकारस्थानात सहभागी करुन घेण्याचे काम शाहनवाज अहमद करायचा. गेल्या काही काळापासून ते उत्तर प्रदेशातील पश्चिम परिसरात सक्रिय होता. या सर्व प्रकरणाबाबत उत्तर प्रदेश एटीएस पत्रकार परिषद घेणार आहे, यामध्ये संपूर्ण मॉड्युलचा गौप्यस्फोट करण्यात येईल. यापूर्वीही उत्तर प्रदेश एटीएसनं केलेल्या कारवाईत कित्येक दहशतवाद्यांना अटक केली आहे.काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ISIS नवीन मॉड्युल 'हरकत-उल-हर्ब-इस्लाम'चा मोठा कट उधळून लावला होता.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीदजम्मू-काश्मीरमध्ये 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यात आला. हा भ्याड हल्ला जैश-ए-मोहम्मदनं केला,ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. कारद्वारे सुरक्षा जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे.