पुलवामा हल्ला; वडील आणि मुलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:15 AM2020-03-04T04:15:37+5:302020-03-04T04:15:48+5:30
‘जैश-ए-मोहम्मद’ने केलेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी त्याच गावातील रहिवासी असलेल्या एका इसमास व त्याच्या मुलीला अटक केली.
नवी दिल्ली : गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी काश्मीरमध्ये पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर ‘जैश-ए-मोहम्मद’ने केलेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपासी यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी त्याच गावातील रहिवासी असलेल्या एका इसमास व त्याच्या मुलीला अटक केली. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
‘एनआयए’ने अटक केलेल्या या दोघांची नावे तारिक अहमद शाह (५० वर्षे) व त्यांची मुलगी इन्शा जहाँ (२३), अशी दिली. हा हल्ला घडवून आणणारा मुख्य ‘बॉम्बर’ आदिल अहमद दर याच्यासह त्याच्या साथीदारांना आश्रय दिल्याच्या आरोपांवरून ही अटक केली गेली. हल्ल्यानंतर ‘जैश’ने जो व्हिडिओ प्रसिद्ध केला होता त्याचे चित्रणही याच दोघांच्या घरात करण्यात आले होते, असेही ‘एनआयए’ने सांगितले.
गेल्या काही दिवसांत करण्यात आलेली ही तिसरी अटक आहे. याआधी हल्ल्याच्या ठिकाणापासून जवळच फर्निचरचे दुकान चालविणाऱ्या शाकीर मगरे यास अटक केली गेली होती. हल्लेखोरांना मगरे याने कट रचण्यात मदत केली.