केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 08:01 PM2017-09-16T20:01:16+5:302017-09-16T20:02:35+5:30
चौकी चौराहा परिसरात भरदविसा त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. गाडीतून आलेल्या एका टोळक्याने त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र डाव फसल्याने अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला.
बरेली, दि. 16 - संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची धाकटी बहिण फरहात नकवी यांनी आपल्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली आहे. चौकी चौराहा परिसरात भरदविसा त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. गाडीतून आलेल्या एका टोळक्याने त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र डाव फसल्याने अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला.
वरिष्ठ पोलीस अधिक्षकांची भेट घेतल्यानंतर फरहात नकवी घरी परतत असताना अपहरणाचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे घटनास्थळावरुन वरिष्ठ पोलीस अधिक्षकांचं कार्यालय फक्त एक किलोमीटर अंतरावरच आहे.
'मी रस्त्याच्या कडेला उभी असताना एक गाडी येऊन माझ्या बाजूला उभी राहिला. आतमध्ये काहीजण बसले होते, त्यांनी मला गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला', अशी माहिती फरहात नकवी यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना दिली आहे. 'माझ्यासोबत असणा-या महिलांनी धाव घेत माझी मदत केली. त्यामुळे मी वाचू शकले', असंही त्यांनी सांगितलं आहे.
ज्या ठिकाणी चौकी चौराहा येथे हा अपहरणाचा प्रयत्न झाला ते गजबजलेलं ठिकाण असून तिथे नेहमी लोकांची वर्दळ असते. महत्वाचं म्हणजे तिथे महिला पोलीस चौकीदेखील आहे. विभागीय आयुक्तांचं कार्यालयही तेथून थोड्याच अंतरावर आहे. असं असतानाही अपहरणाचा प्रयत्न झाल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
जी व्यक्ती कार चालवत होती त्याने मला तुला नंतर पाहून घेईन अशी धमकी दिल्याचंही फरहात नकवी बोलल्या आहेत. 'गाडीत बसलेल्यांचे चेहरे मी व्यवस्थित पाहू शकले नाही, त्यामुळे त्यांना ओळखणं कठीम आहे. गाडीचा नंबरही मी पाहू शकले नाही', अशी माहिती फरहात नकवी यांनी दिली आहे. गाडीमध्ये नेमके किती जण होते याबाबतही फरहात नकवी नक्की सांगू शकल्या नाहीत.
फरहात नकवी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फरहात नकवी बरेलीमधील किला परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. घटस्फोट झालेल्या महिलांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी त्या एक सामाजिक संघटना चालवतात. आपल्या एका कामानिमित्त त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या. तेथून परतत असतानाचा हा प्रकार घडला.
पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न होता का ? या दिशेने तपास सुरु केला आहे. 'आम्ही गाडीचा आणि गाडीमधील लोकांचा शोध घेण्यासाठी काही पुरावा हाती लागतो का यासाठी प्रयत्न करत आहोत', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
(फोटो सौजन्य - हिंदुस्तान टाईम्स)