पूंछमधील हल्ल्याचा प्रयत्न उधळला; पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तीन साथीदारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 01:44 AM2020-12-28T01:44:14+5:302020-12-28T06:57:56+5:30
पाकिस्तानी हस्तकाच्या हुकुमानुसार मंदिरात हल्ला करून पूंछ जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचा त्यांचा डाव होता.
जम्मू : सीमावर्ती पूंछ जिल्ह्यातील एका मंदिरात हल्ला करण्याचा डाव उधळून लावत पोलिसांनी पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तीन साथीदारांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून सहा बॉम्ब जप्त केले.
पूंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश कुमार अंग्राल यांनी सांगितले की, पाकिस्तानी हस्तकाच्या हुकुमानुसार मंदिरात हल्ला करून पूंछ जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचा त्यांचा डाव होता. स्थानिक पोलिसांच्या विशेष कार्य गटाने आणि राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून मुस्तफा इक्बाल खान आणि मुर्तूझा इक्बाल या दोन भावांना शनिवारी बसुनीनजीक अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मंदिरात हल्ला करण्याच्या कटाचा पर्दाफाश झाला. ४९ राष्ट्रीय रायफल्सच्या बसुनीस्थित मुख्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली होती.
मुस्तफाला पाकिस्तानातून आलेल्या फोनवर बॉम्बहल्ला करण्याचे निर्देश दिले होते. मुस्तफाच्या फोनमध्ये बॉम्बफेक कशी करायची, याचा व्हिडिओ आढळला. त्याचा अतिरेकी कारवायांत सहभाग असल्याचेही आढळले असून, त्याच्या कबुलीवरून त्याचे दोन साथीदार मोहम्मद यासिन आणि रईस अहमद या दोघांनाही पकडण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
सहा बॉम्ब जप्त
तिघांच्या कसून चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. मुस्तफाच्या घरावर धाड टाकून सहा बॉम्ब जप्त केले आहेत.
पाकिस्तानी निशाणी असलेले काही फुगे आणि जे अँड के फोर्स या संघटनेची काही पत्रकेही आढळली आहेत. हल्ले करण्याचे निर्देश देणाऱ्याशी ते संपर्कात होते.