हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : मुख्यमंत्रिपद सोडण्यास काँग्रेसने भाग पाडल्यामुळे संतापलेले कॅप्टन अमरिंदर सिंग तसेच त्यांच्या समर्थक यांनी आपल्या पक्षात यावे, यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व राष्ट्रवादी मंडळींनी आमच्याकडे यायला हवे, असे भाजप नेते बोलू लागले आहेत.भाजपचे सरचिटणीस व पंजाबचे पक्षप्रभारी दुष्यंत गौतम म्हणाले की, अमरिंदर सिंग वा त्यांच्या समर्थकांना पक्षात यायचे असेल, तर त्यांचे स्वागतच होईल. त्यांना कोणी विरोध करणार नाही. आम्ही पंजाब विधानसभेच्या सर्व ११७ जागा लढवणार असल्याने अनेक नेतेमंडळी भाजपमध्ये येत आहेत. पंजाब हे सीमेवरील राज्य आहे आणि तिथे स्थिर सरकार असायला हवे. त्यासाठी सर्व राष्ट्रवादी शक्तींनी एकत्र यायलाच हवे.
कॅप्टन सिंग यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांनी केले आहे. त्याकडे लक्ष वेधता गौतम म्हणाले की, त्यात काय चूक आहे. ते म्हणाले ते योग्यच आहे. पंजाबबाबत आज पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली. तिथे अकाली दल काँग्रेस, आम आदमी पार्टी व भाजप अशा चौरंगी लढती होतील, असे आज स्पष्ट झाले आहे.