कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनच्या परिणामांवर लक्ष, नागरिकांच्या सुरक्षिततेला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 04:04 AM2021-03-14T04:04:39+5:302021-03-14T06:49:09+5:30
कोविशिल्ड लसीचे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन केले जाते, तर कोव्हॅक्सिन लस हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे.
नवी दिल्ली : अॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड कंपनीने विकसित केलेली कोविशिल्ड लस घेतलेल्यांपैकी काहीजणांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रकार काही देशांत घडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारही चिंतित झाले आहे. देशात लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी वापरल्या जात आहेत. या लसींचे लोकांवर काय परिणाम होतात याकडे केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. (attention to the effects of covacin and Covishield the highest priority of the central government on the safety of citizens)
कोविशिल्ड लसीचे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन केले जाते, तर कोव्हॅक्सिन लस हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे. या लसींच्या आपत्कालीन वापराला देशातील औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. कोरोना साथीसंदर्भात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने नेमलेल्या कृती गटाचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले की, केंद्र सरकार कोणत्याही एका विशिष्ट लसीवर लक्ष ठेवत नाही. लसीमुळे सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम जाणवतात. लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे प्रकृती खूपच बिघडली तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते किंवा ती व्यक्ती मरण पावते. अतिशय गंभीर स्वरूपाच्या दुष्परिणामांवर केंद्र सरकारने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
जगभरातील घटनांचा अभ्यास
आयसीएमआरने नेमलेल्या तज्ज्ञांच्या कृती गटाचे आणखी एक सदस्य डॉ. राजिंदर धमिजा यांनी सांगितले की, कोरोना लसीकरण मोहीम राबविताना सुरक्षिततेचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहेत. जगभरात लसी घेतल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाला होता, पण या मृत्यूला लस कारणीभूत
असल्याचे ठोस पुरावे हातात आलेले नाहीत.