रायपूर, दि. 17 - छत्तीसगडमधील जसपूर येथील स्थानिक एका अनोख्या लग्नसोहळ्याचे साक्षीदार बनले आहेत. 75 वर्षांचा वर आणि 70 वर्षांची वधूचा अनोखा असा विवाहसोहळा याठिकाणी संपन्न झालेला आहे. विशेष म्हणजे या अनोख्या लग्नसोहळ्यात वधू-वराला शुभेच्छा देण्यासाठी काही राजकीय नेतेमंडळीदेखील सहभागी झाले होते. जिमनाबरी बाई आणि रतिया राम असे वधूवराचं नाव असून दोघंही लग्नबेडीत अडकले आहेत. या दोघांच्या अजब लग्नाच्या गजब गोष्टीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
भाजपाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रबल प्रताप जूदेव, जसपूरचे माजी आमदार जगेश्वर राम भगत यांच्यासहीत अनेक दिग्गजांनी या विवाहसोहळ्यात हजेरी लावून वधूवराला शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय, संपूर्ण गावदेखील या लग्नसोहळ्याचे साक्षीदार बनले होते. हा लग्नसोहळा योग्य पद्धतीनं पार पाडण्याची जबाबदारी बगडोल पंचायतचे सरपंच ललित नागेश यांनी स्वीकारली होती व पूर्णदेखील केली.
वाचा आणखी बातम्या (पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा)(धक्कादायक !16 वर्षाच्या मुलीचे 65 वर्षाच्या शेखसोबत लावले लग्न)(देशातील सर्व मुस्लिम दहशतीखाली - शिवपाल यादव)
विशेष म्हणजे रतिया राम आणि जीवना यांचे उतार वयातील आयुष्य एकटेपणानं भरलेले होते. काही वर्षांपूर्वी रतिया राम यांच्या पत्नीचं निधन झाले तर 10 वर्षांपूर्वी त्यांचा मुलाचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे जिमनाबरी बाईदेखील आयुष्य एकट्यानंच जगत होत्या. या दोघांचीही ओळख एका कार्यक्रमादरम्यान झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रित झाल्यानंतर दोघांनीही उर्वरित आयुष्य एकत्रित जगण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला ग्रामस्थांनीही साथ दिली.