नवी दिल्ली - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर आज लखनौचे एक विशेष न्यायालय मोठा निर्णय देणार आहे. या प्रकरणात भाजपाचे वरिष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यासह एकूण 32 आरोपी आहेत. याच आरोपींतील एक असलेले रामजन्मभूमी न्यासचे सदस्य रामविलास वेदांती (Ram Vilas Vedanti) यांनी निकालापूर्वीच, "आपण बाबरी ढाचा तोडवला आहे आणि यासाठी आपल्याला फाशीची शिक्षा झाली तरी तयार आहे," असे म्हटले आहे.
रामललांसाठी फाशीलाही तयार - वेदांतीवेदांती म्हमाले, 'आम्हाला विश्वास आहे, की मंदिर होते, मंदिर आहे आणि मंदिर राहील. आम्ही तो ढाचा तोडवला, याचा आम्हाला अभिमान आहे. ढाचा तोडण्याच्या आरोपात फाशी झाली, जन्मठेपेची शिक्षाही झाली, तरी आम्ही रामललासाठी जेलमध्ये जाण्यास आणि फासावर जाण्यास तयार आहोत. मात्र, रामललांना सोडण्यास तयार नाही.'
बाबर तर कधी अयोध्येत आलाच नव्हता - वेदांती -वेदांती म्हणाले, 'अयोध्येत प्रभू रामांचा जन्म झाला. बाबर कधी अयोध्येत आलाच नाही. मग बाबरी मशीद कशी. हा प्रश्नच उपस्थित होत नाही. यासाठी आम्ही 2005मध्ये एका महिन्याच्या साक्षीत सिद्ध केले होते, की जेथे रामलला विराजमान आहे, तीच राम जन्मभूमी आहे.'
आरोपींना होऊ शकते 3 वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा -बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा निकाल आज 28 वर्षांनंतर येत आहे. या प्रकरणात भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani), मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi), उमा भारती (Uma Bharti) यांच्यासह एकूण 32 आरोपींवर आज लखनौचे सीबीआय न्यायालय निर्णय देणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यास अनेक नेत्यांना 3 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतचीही शिक्षा होऊ शकते.
बाबरी विध्वंस प्रकरणात होते एकूण 49 आरोपी -बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, तत्कालीन शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि उमा भारती यांच्याविरोधत होती.