अयोध्येतील राम मंदिराच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' आली समोर, कसं सुरूय काम पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 06:01 PM2021-06-30T18:01:37+5:302021-06-30T18:03:22+5:30
अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिर उभारणीचं काम (Ram Mandir Construction) मोठ्या वेगात सुरू आहे
अयोध्येत (Ayodhya) भव्य राम मंदिर उभारणीचं काम (Ram Mandir Construction) मोठ्या वेगात सुरू आहे. यातच राम मंदिर उभारणीच्या कामाची 'सेटेलाइट इमेज' समोर आली आहे. यात राम मंदिर उभारणीचं काम सुरू असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. गुगल अर्थच्या (Google Earth)फोटोमध्ये खोदकाम आणि माती काढण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येतं. (Ayodhya Ram Mandir Construction caught in satellite images, shows excavated land and debris extraction)
राम मंदिराचा पाया मजबूत करण्यासाठी जमिनीच्या खाली ४० फूट खोल सीमेंटचे भव्य खांब तयार करण्याचं काम केलं जात आहे. असे जवळपास ४५ खांब उभारण्यात आल्यानंतर १२ फूट उंच चबुतऱ्यावर राम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचं काम सुरू केलं जाणार आहे. राम मंदिराच्या मुख्य पायासाठी ४० फूट खोल खोदकाम करण्यात आलं आहे. यात सापडलेल्या अनेक प्राचीन मुर्ती आणि मंदिराचे अवशेष सांभाळून ठेवण्यात आले आहेत.
पायाभरणीचं काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार
अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या दुसऱ्या टप्प्याला डिसेंबरमध्ये सुरूवात होईल. राम मंदिर ट्रस्टच्या माहितीनुसार पायाभरणीचं काम ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि डिसेंबरपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. यात मंदिराचा मुख्य साचा तयार करण्याचं काम केलं जाणार आहे.
"डिसेंबरमध्ये मिर्झापुरी गुलाबी दगडांच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल आणि यासाठीची ऑर्डर देखील देण्यात आली आहे. राम जन्मभूमीवरच या दगडांना आकार देण्याचं काम सुरू केलं जाईल. ४०० फूट लांब, ३०० फूट रुंद आणि ५० फूट खोल पायामध्ये १० इंच इतक्या जाडसर मिश्रणाचं प्लास्टर केलं जाणार आहे", अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी दिली. राम मंदिराचं काम डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.