PM मोदी, मोहन भागवत अन्...रामललाच्या अभिषेकावेळी फक्त 'हे' 5 जण उपस्थित राहणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:59 PM2023-12-29T16:59:36+5:302023-12-29T17:00:25+5:30
प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेवेळी गर्भगृहात फक्त पाच जण उपस्थित राहणार आहेत.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रभू श्री रामाचे आगमन होत असल्यामुळे अयोध्येचा कानाकोपरा सजवण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी रामललाची प्रतिष्ठापणा होईल. या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वेळी गर्भगृहात केवळ 5 लोक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, RSS प्रमुख मोहन भागवत आणि मंदिराचे आचार्य (मुख्य पुजारी) अभिषेकावेळी गर्भगृहात उपस्थित राहतील.
रामललाच्या प्रतिष्ठापणेच्या दिवशी शेकडो व्हीआयपींसह देश-विदेशातून लाखो भाविक येणार आहेत. त्यामुळे अयोध्या प्रशासनही अलर्टवर आहे. शहरातील चौका-चौकात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांची विशेष पथकेही शहरात दाखल झाली आहेत. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आयोजनावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Pictures taken this morning at Shri Ram Janmabhoomi Mandir site.
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) December 24, 2023
श्री राम जन्मभूमि मंदिर परिसर में आज प्रातः काल लिए गए चित्र pic.twitter.com/MOaDIiS91Y
उद्या, म्हणजेच 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील नवीन विमानतळ, रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहेत. यावेळी पीएम मोदी वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवतील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. सीएम योगी राम मंदिराच्या कामाची आणि विमानतळ, रेल्वे स्टेशनचीही पाहणी करतील.
16 जानेवारीपासून सोहळ्याला सुरुवात
7 दिवसीय प्राण प्रतिष्ठा सोहळा 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 16 जानेवारीला विष्णूपूजा आणि गाय दान होईल. यानंतर 17 जानेवारीला रामललाची मूर्ती शहर भ्रमंती करून राम मंदिरात नेण्यात येईल. 18 जानेवारी रोजी गणेशाची पूजा केली जाणार आहे. यासोबतच वरुण देवपूजा आणि वास्तुपूजाही होणार आहे. 19 जानेवारी रोजी हवन अग्नि प्रज्वलित करण्यात येईल. 21 जानेवारी रोजी राम लालाच्या मूर्तीला पवित्र नद्यांच्या पवित्र पाण्याने स्नान घालण्यात येईल, तर 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडेल.
प्राणप्रतिष्ठेसाठी खास मुहूर्त
22 जानेवारी रोजी अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात राम ललाच्या अभिषेकसाठी 84 सेकंदांचा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त असेल, ज्यामध्ये राम ललाला अभिषेक केला जाईल. काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी हा शुभ काळ निवडला आहे. हा शुभ मुहूर्त केवळ 84 सेकंदांचा असेल, जो 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंदांपर्यंत आहे.