संतोष ठाकूर नवी दिल्ली : अयोध्या निकालावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आमची इच्छा पूर्ण झाली. हा निकाल कुणाच्या जय वा पराजयाचा नाही. जुन्या गोष्टी सोडून सर्वांनी भव्य राम मंदिर निर्माणासाठी सहकार्य करायला हवे. मोहन भागवत म्हणाले की, संघाला या वादावर तोडगा हवा होता. या निर्णयाने मी संतुष्ट आहे. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून निर्णय दिला आहे. आम्हाला तो स्वीकार करावा लागेल.मथुरा-काशीबाबत संघ काही आंदोलन करणार आहे काय? असे विचारले असता ते म्हणाले की, संघ आंदोलन करीत नाही. माणूस घडविणे हे संघाचे काम आहे. आम्ही या कामाला पुन्हा सुरुवात करु. न्यायालयाच्या निर्णयाने आम्ही संतुष्ट आहोत. मंदिर उभारणीसाठी आपली भूमिका पार पाडू. मशिदीच्या जागेबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आम्हाला जमीन शोधायची नाही. ते सरकारचे काम आहे. देशातील मुस्लिम नागरिकांना संदेश देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, देशाचा नागरिक हा केवळ देशाचा नागरिक असतो. तो हिंदू वा मुस्लिम नागरिक नसतो. सर्वांना मिळून राहायचे आहे. आम्हाला आशा आहे की, सर्व लोक या निर्णयाचे स्वागत करतील.
''अयोध्या निकाल ‘जय-पराजया’चा नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 3:34 AM