अयोध्या खटला : सुन्नी वक्फ बोर्ड कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याशी सहमत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 11:44 PM2017-12-06T23:44:16+5:302017-12-06T23:44:45+5:30
अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे. कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाल्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने सिब्बल यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला वेगळे केले होते. मात्र आत त्यांनी सिब्बल यांच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे.
या प्रकरणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या जफरयाब जिलानी यांनी सांगितले की, "सुप्रीम कोर्टातील चर्चेदरम्यान, मुस्लिम पक्षकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी आपल्या अशिलांच्या सांगण्यावरून खटल्याची सुनावणी टाळण्याची अपील केली होती." मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून आलेल्या या वक्तव्यानंतर अयोध्या खटल्यातील याचिकाकर्ते हाजी महबूब यांनी सांगितले की, "जर जिलानी यांना कपिल सिब्बल यांनी केलेले वक्तव्य योग्य वाटत असेल तर मीसुद्धा त्यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत आहे. याप्रकरणी याहून अधिक काही मी बोलू शकत नाही." मात्र याआधी कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यापासून लॉ बोर्डाने स्वत:ला दूर ठेवले होते.
अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली. ६ डिसेंबर १९९२ रोजी ही मशीद कारसेवकांनी पाडली होती. तसेच या परिसरातील रामजन्मभूमीचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू आहे.