Ayodhya Verdict: अयोध्येच्या नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 03:31 AM2019-11-10T03:31:06+5:302019-11-10T03:32:26+5:30
रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिल्यानंतर अयोध्येतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अयोध्या : रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिल्यानंतर अयोध्येतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेली अनेक दशके अयोध्येत सुरू असलेल्या या वादामुळे तेथील नागरिकांना जातीय तणाव, हिंसाचार अशा घटनांचा वेळोवेळी सामना करावा लागला होता. अयोध्येतील वादग्रस्त भूमी राममंदिराच्या उभारणीसाठी न्यायालयाने देऊ केल्याने आता हा सारा वादच संपुष्टात आला आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. निकालाच्या आधी किंवा नंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून या शहराच्या गल्लीबोळात पोलिसांनी बॅरिकेड उभारली होती. निकालानंतर अयोध्येतील काही ठिकाणी हल्ले होतील या भीतीने तेथील नागरिकांनी आपल्या घरातील महिला, मुले यांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. नेमका काय निकाल लागेल व त्यानंतर काय होईल याविषयी अयोध्येतील रहिवाशांच्या मनात अनेक शंका होत्या. त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करत होते, त्यावेळेस अयोध्येतील रिकबगंज भागातील रहिवासी प्रीती सिंह या आपल्या मुलासमवेत दूर्गादेवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. निकालाचा तपशील ऐकून त्यांनी देवाचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अयोध्येत हनुमानगढी भागात काही युवकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. शिंपीकाम करणाऱ्या मोहम्मद सईद यांनी सांगितले की, न्यायालयाचा निकाल अपूर्ण आहे. मात्र त्यासंदर्भात त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांनी शनिवारी निकालाबाबत आनंद व्यक्त केला. त्यातील भारत सिंह यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर लगेचच अर्ध्या तासाने म्हणजे सकाळी ११.३० वाजता रामलल्लाचे दर्शन घेतले. रामजन्मभूमीचा वाद सुटल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले असेही ते म्हणाले.
>पुजाºयाकडून न्यायालयाचे अभिनंदन
हनुमानगढी मंदिरातील पुजारी महंत राजूदास म्हणाले की, गेल्या पाचशे वर्षांपासून चिघळलेला वाद सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सुटला आहे. न्यायालयाने घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालय व सरन्यायाधीशांचे मी अभिनंदन करतो. लखनऊ येथील काही नागरिक मात्र वेगळ््या प्रकारे व्यक्त झाले. तेथील एक चहाविक्रेता राजू म्हणाला की, आम्हाला शांतता हवी आहे. त्यामुळे माझा उद्योगधंदा नीटपणे करता येईल.