नवी दिल्ली : देशातील प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेदाशी संबंधित हॉस्पिटल सुरु करण्याचा मानस आहे, असे सांगतानाच आयुर्वेदात तत्काळ आराम देणा-या औषधांची निर्मिती व्हावी, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशातील पहिले अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी खासगी क्षेत्रालाही असे सांगू इच्छितो की, त्यांनी सामाजिक दायित्व म्हणून निधीचा एक भाग आयुर्वेदाला मजबूत करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित संस्था सुरु करण्यासाठी खर्च करावा. जो देश आपल्या देशाचा वारसा, परंपरा याचा अभिमान बाळगत नाही तोपर्यंत तो देश प्रगती करु शकत नाही. आपला वारसा सोडून प्रगती करु पाहणा-या देशांची ओळख संपणे निश्चित असते. आम्ही गत ३० वर्षात आयटी क्षेत्रातील क्रांती पाहिली. आता आयुर्वेदातील आरोग्य क्रांतीची वेळ आली आहे.आयुर्वेदाच्या प्रगतीसाठी आयुष मंत्रालय जोमाने काम करत आहे. गत तीन वर्षात ६५ पेक्षा अधिक संस्था सुरु करण्यात आल्या आहेत. जगात आज हर्बल औषधींचे मोठे मार्केट तयार होत आहे. त्यासाठी भारताने आपल्या क्षमतांचा वापर करावा. आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही. याच्या कक्षेत सामाजिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण यासारखे विषय येतात. याची आवश्यकता ओळखून सरकार आयुर्वेद, योग आणि अन्य पद्धतींच्या आरोग्य सेवेतील समन्वयावर जोर देत आहे.
आयुर्वेदात औषधे शोधण्याची गरज , पंतप्रधान मोदी; ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद’ राष्ट्राला समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:15 AM