B. S. Yediyurappa : नेतृत्वाने सांगितल्यास मुख्यमंत्रीपद सोडू, येडीयुरप्पा यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 06:18 AM2021-06-07T06:18:51+5:302021-06-07T06:19:19+5:30
B. S. Yediyurappa : येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बंगळुरू : भाजपचे केंद्रीय नेते सांगतील तेव्हा मी मुख्यमंत्रीपद सोडेन. ते राजीनामा द्या असे सांगत नाहीत तोपर्यंत मी या पदावर आहे. राजीनामा द्यावा लागला तरीही मी काम करत राहीन असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी रविवारी सांगितले.
येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून लवकरच हटविण्यात येईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली तरी त्यानंतरही मी राज्याच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे सुरूच ठेवणार आहे. जनतेच्या कल्याणासाठी मी सातत्याने झटत आहे. मला या पदावर यापुढील काळात ठेवायचे की नाही याचा निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेईल.
मस्की विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा अगदीच कमी मतांच्या फरकाने विजय मिळाला. या गोष्टींचे खापर येडीयुरप्पांच्या नेतृत्वावर फोडण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येडीयुरप्पा यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी संबंध ताणले गेले आहेत. कर्नाटक भाजपमध्ये उफाळून आलेला असंतोष तसेच राज्यातील कोरोना स्थितीत सुधारणा न होणे या समस्यांचा येडीयुरप्पांना सध्या सामना करावा लागत आहे.
काही नेत्यांचा भक्कम पाठिंबा
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना पदावरून हटविण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा सध्यातरी विचार नाही असे या राज्यातील काही भाजप नेतेच सांगत आहेत. उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथनारायण यांनी सांगितले की, येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. येडीयुरप्पांना भाजपचे सरचिटणीस सी. टी. राव यांच्यासह पक्षातील काही नेत्यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे.