Baba Ramdev in Goa: रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांसारख्या अब्जाधीश उद्योगपतींपेक्षा आपला वेळ अधिक मौल्यवान असल्याचे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले. खरे पाहता, रामदेव बाबा हे योगगुरू आणि उद्योजक आहेत. पण त्यांनी आपल्या वेळेची तुलना थेट देशातील सर्वात मोठ्या तीन-चार उद्योगपतींच्या वेळेशी केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. पण त्यांनी त्यांच्या या विधानामागचा अर्थ पटवून दिला.
रामदेव म्हणाले की कॉर्पोरेटमधील लोक ९९ टक्के वेळ स्वतःसाठी वापरतात, तर योगसाधना करणाऱ्यांचा, संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी असतो. अंबानी आणि अदानींसारख्या अब्जाधीशांनी घालवलेल्या वेळेपेक्षा माझा तीन दिवसांचा मुक्काम केल्याचा वेळ हा अधिक मोलाचा आहे. रामदेव त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे देखील उपस्थित होते.
आणखी काय म्हणाले बाबा रामदेव?
"मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. माझ्या वेळेची किंमत अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांच्यापेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेटमधील लोक हे ९९ टक्के वेळ हा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, तर संताचा वेळ हा सर्वांच्या भल्यासाठी वापरला जातो. अकबर, बाबर किंवा औरंगजेब नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत," असे बाबा रामदेव म्हणाले.
"आम्हाला बहुतांश राज्य बोर्ड किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये चुकीचा इतिहास शिकवला गेला आहे. या पुस्तकांमध्ये मुघलांचा गौरव करण्यात आला आहे. हे बदलायला हवे. अकबर, बाबर किंवा औरंगजेब हे आमचे नायक नाहीत. आपले महान वीर छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि इतर देशासाठी बलिदान देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट महान आहे, हा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांनी कधीही कोणत्याही धर्म, वर्गाबाबत भेदभाव केला नाही, तर सर्वांना बरोबर घेऊन चालायचे," अशा शब्दात त्यांनी महापुरूषांचा गौरव केला.
"पाकिस्तानच्या आर्थिक संकटाबाबत त्यांनी शेरेबाजी केली. पाकिस्तान हा देश सध्या फारच वाईट स्थितीत आहे. पाकिस्तानने काय करावे हे आता त्यांच्या नियंत्रणात नाही. पाकिस्तानी सरकारच्या अत्यंत चुकीच्या धोरणांचा फटका त्यांना बसला आहे. त्यामुळेच हा शेजारी देश आर्थिक संकटातून जात आहे आणि त्याचे लवकरच चार भाग होणार आहेत. त्यामुळे आता तो एक छोटासा देश म्हणून शिल्लक राहील," अशी भविष्यवाणीही बाबा रामदेव यांनी केली.