बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध बांधली होती मशीद - शिया वक्फ बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 09:22 AM2017-08-22T09:22:32+5:302017-08-22T09:24:43+5:30
'16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होती'
नवी दिल्ली, दि. 22 - अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा करणा-या शिया वक्फ बोर्डाने अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. शिया बोर्डाने सोमवारी न्यायालयात सांगितलं की, 16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होती, आणि येथूनच हिंदू - मुस्लिम वादाला सुरुवात झाली. बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मीर बाकी हा बाबरच्या लष्कराचा सेनापती होता. तो शिया होता आणि त्याने हिंदूच्या भावनांविरोधात जात मुघल लष्कराचा वापर केला. 1528-29 दरम्यान त्याने मंदिरांच्या मधोमध मशीद उभारली. हा वादा सुरु करण्याचं काम त्यानेच केलं आहे'.
याआधीही शिया वक्फ बोर्डाने न्यायालयात माहिती देताना सांगितलं होतं की, अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हारल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 30 मार्च 1946 रोजी ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाला शिया वक्फ बोर्डाने आव्हान दिलं आहे, ज्यामध्ये मशिदीला सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत शिया वक्फ बोर्डाने सांगितलं आहे की, 'बाबरी मशीद बांधण्यासाठी त्याठिकाणी असलेलं मंदिर नष्ट करण्यात आलं होतं'.
वसीम रिझवी यांनी सांगितलं आहे की, 'शिया वक्फ बोर्डाने सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला असून, वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या परिसरात मशीद उभारली जाऊ शकते'. मशिदीला बाबर किंवा मीर बाकीचं नाव देण्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, 'सर्व वाद संपतील असं नाव मशिदीला द्दयायचं आहे. नव्या मशिदीचं नाव मस्जिद-ए-अमन असं ठेवण्यात येईल, जे शांततेचा संदेश देण्याचं काम करेल'.
इरानच्या मौलवींनीही हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे यासाठी समर्थन दिलं आहे. यासंबंधी कोणताही वाद होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मीर बाकी याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद होऊ फूट पडली. हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला असं रिझवी बोलले आहेत. 'आज तिथे मशीद नाही आहे. पण दहशतवाद पसरवण्यासाठी परदेशातून येणारा पैसा जमा करणारे काही मुस्लिम धर्मगुरु इस्लामचं नाव खराब करत आहेत', अशी खंत रिझवी यांनी व्यक्त केली आहे.