जयपूर - राजस्थानमधील किशनगंज विधानसभा मतदारसंघ क्षेत्राच्या शाहबाद परिसरात एक बॅलट युनिट रस्त्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, बॅलेट युनिट हाताळण्यात निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सध्या हे बॅलेट युनिट किशनगंजच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. यापूर्वी राजस्थानमधील आदर्श नगरमधूनही ईव्हीएमसंदर्भातील व्हिडीओ समोर आला होता. येथे तर एक भाजपाच्या नेत्याच्या घरासमोर ईव्हीएम ठेवण्यात आल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते.
(राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल)
छत्तीसगडमधून अटक दरम्यान, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यात स्ट्राँग रुम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना अटक केली. तर याप्रकरणी दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. बस्तर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय जगदलपूरमधील धरमपुरा परिसरातील महिला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बनवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसरात लॅपटॉप घेऊन प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी उमापति तिवारी, विजय मरकामसहीत आणखी एका युवकाला अटक केली.