चेन्नई - तामिळनाडू सरकारने शाळकरी मुलींना पायात पैंजण घालण्यावर बंदी घातली आहे. शिक्षण विभागाने मुलींच्या पायात पैंजण अन् डोक्यात फूल घालण्यास संपूर्ण राज्यात ही बंदी लागू केली आहे. मुलींच्या पायातील पैंजणाच्या आवाजाने अन् डोक्यातील गुलाबाच्या सुवासाने मुलांचे लक्ष विचलित होते, त्यामुळे ही बंदी घालण्यात आल्याचा अजब-गजब तर्क तामिळनाडू सरकारने लावला आहे.
तामिळनाडूमध्ये सध्या एआयएडीएमकेचे सरकार असून इडापद्दी पलानीस्वामी हे तेथील मुख्यमंत्री आहेत. तर शालेय शिक्षणमंत्री केए सेनगोट्टाईयन असून मुलींवर लादण्यात आलेल्या या बंधनांमुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री केए सेनगोट्टाईयन हे त्यांच्या विधानसभा क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांना सायकली वाटण्यासाठी गेले होते, त्यावेळी तेथेही सेनगोट्टाईयन यांनी हे वक्तव्य केलं होतं. जर एखाद्याने अंगठी घातली असेल, पण ती अंगठी हरविल्यास त्या व्यक्तीला दु:ख होते. तसेच ती अंगठी चोरणाऱ्या व्यक्तीविरोधात त्याच्या मनात कटुता निर्माण होते. त्याचप्रमाणे, मुलींनी पायात पैंजण घातल्यास, त्यांच्या पायातील घुंगरांच्या आवाजाने मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. पण, एखादी मुलगी आपल्या डोक्यात फुल परिधान करत असेल तर कुठलीही अडचण नाही, असे सेनगोट्टाईयन यांनी म्हटले होते.
दरम्यान, राज्यात मुलींसाठी ही बंधनं घालण्यात आली आहे, पण मुलांना कुठलीही बंधने नाहीत. मुलांसाठी दाढी ठेवणे, केसांची स्टाईल किंवा शर्टाची खुली बटने बंद ठेवण्यासंदर्भातही कुठलेही धोरण किंवा बंधन घालण्यात येत नाहीत.