- एस. के. गुप्तानवी दिल्ली : देशभरातील सर्व विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांच्या कॅम्पसमध्ये चमचमीत परंतु सत्वहीन अन्नपदार्थांच्या (जंक फूड) विक्रीस पूर्ण बंदी करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. केवळ कॉलेजच्या कॅन्टिनमध्येच नव्हे तर विद्यार्थ्यांनी एरवीही ‘जंक फूड’चा त्याग करावा यासाठी त्यांचे समुपदेशन करून आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यावरही आयोगाने भर दिला आहे.आयोग म्हणतो की, विद्यापीठे आणि कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ला बंदी केल्याने आरोग्यदायी खाद्यपदार्थांचे नवे मापदंड प्रस्थापित होतील. याने विद्यार्थ्यांचे आयुष्य अधित आरोग्यसंपन्न होईल, ते अधिक चांगला अभ्यास करू शकतील व त्यांच्यातील अतिलठ्ठपणाचे प्रमाणही कमी होईल. जीवनशैलीशी निगडित व्याधींचे अतिलठ्ठपणाशी निकटचे नाते असल्याने विद्यार्थी अशा व्याधींपासूनही मुक्त राहू शकतील. खरं तर आयोगाने असे निर्देश विद्यापीठांना द्यावेत, असा आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २० आॅक्टोबर २०१६ रोजीच दिला होता. त्यानुसार आोयगाने लगेच विद्यापीठांना पत्रही पाठविले होते. परंतु त्याची पारशी अंमलबजावणी न झाल्याचे दिसल्याने आता आयोगाने जुन्या पत्राचा संदर्भ देत तेच निर्देश नव्याने जारी केले आहेत. या निर्णयाची कसोशीने अंमलबजावणी करावी आणि तरुणपिढी मित्रपरिवाराच्या दबावाने वाईट सवयींच्या सहजपणे आहारी जाण्याची शक्यता असल्याने त्याविरुद्ध कल्पकतेने जनजागृतीही करावी, असेही विद्यापीठांना सांगण्यात आले आहे.स्निग्धपदार्थ, मीठ व साखरेचे प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ तरुण पिढीच्या आरोग्यास घातक असल्याने तरुणांना यापासून परावृत्त करण्यासाठी खास प्रयत्न केले जावेत, असा आग्रह महिला व बालकल्याण मंत्रालयाने धरल्यानंतर शिक्षणक्षेत्रात हे पाऊल उचलले गेले आहे. याधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानेही (सीबीएई) असे निर्देश त्यांच्या संलग्न शाळांना दिले होते.विद्यापीठांकडून काय आहेत अपेक्षा?‘जंक फूड’चे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे.विद्यार्थ्यांना सुआरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी आधी त्यांची आरोग्यविषयक माहिती गोळा करणे.आरोग्याविषयी डोळसपणा येण्यासाठी अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रम घेणे.विद्याथी कल्याण विभागात ‘ वेलनेस क्लस्टर’ तयार करणे. तेथे सकस खाणे, योग्य व्यायाम आणि आरोग्यदायी सवयींवर समुपदेशन करणे.
विद्यापीठे, कॉलेजांमध्ये ‘जंक फूड’ विक्रीस बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 2:48 AM