बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:48 PM2024-12-11T13:48:26+5:302024-12-11T13:48:55+5:30

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता.

Bangladesh BNP associate bodies start long march towards Agartala India; India alert, border tension will increase | बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार

बांगलादेशच्या BNP पार्टीचा ढाका ते आगरताळा मोर्चा; भारत अलर्ट, सीमेवर तणाव वाढणार

ढाका - भारतातील त्रिपुराची राजधानी आगरताळा इथं बांगलादेशी उच्चायुक्ताच्या कार्यालयावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) ने मोठी घोषणा केली आहे. बीएनपीसह ३ संघटना मिळून ज्यात जातीयताबादी जुबो दल, स्वेचसेबक दल आणि छात्र दल ढाका ते आगारताळापर्यंत मोर्चा काढणार आहेत. सकाळी ९ वाजल्यापासून या मोर्चाला ढाकाच्या नयापलटन येथील बीएनपी कार्यालयासमोर लोक जमले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

बीएनपीच्या मित्र पक्षांनी सांगितले की, त्रिपुराची राजधानी आगरताळाच्या दिशेने लाँग मार्च काढला जाईल. त्याठिकाणी बांगलादेशच्या  उच्चायुक्तावरच हल्ला झाला नाही तर राष्ट्रध्वजाचा अवमान करून जातीय दंगली भडकवण्याचा कटही रचला गेला. ढाकात आगरताळाच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चातील लोकांनी भारतावर बांगलादेशविरोधात गंभीर षडयंत्र रचत असल्याचा आरोप लावला आहे.

सीमेवर सुरक्षा वाढवली, जवान अलर्ट

बीएनपीने घोषित केलेल्या आंदोलनामुळे भारतीय सुरक्षा दलाने सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. त्याठिकाणी कुठलीही तणावग्रस्त स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जवान अलर्ट आहेत. ३ दिवसांपूर्वी बीएनपी आणि त्यांच्या संघटनांनी ढाकात मोर्चा काढला होता. हा मोर्चा बीएनपी कार्यालयापासून सुरू झाला होता ज्याला रामपुरा इथं पोलिसांनी रोखले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जात आगरताळा येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन दिले. 

बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयाच्या इमारतीवर २ डिसेंबर रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे हल्ला झाला होता. बांगलादेशमध्ये हिंदू संत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेविरोधात लोकांनी रॅली काढली होती तेव्हा हा प्रकार घडला. यावेळी काही लोक उच्चायुक्तालयात घुसले होते. या लोकांनी बांगलादेशच्या ध्वजाची तोडफोड करून तो खाली उतरवून त्याला आग लावल्याचा आरोप आहे. या घटनेबद्दल भारत सरकारने  दु:ख व्यक्त केले होते. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडले गेले. त्यानंतर बांग्लादेश आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भारतात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा पक्ष बीएनपी भारताविरोधात आक्रमक आहे. बांगलादेशाला बदनाम करण्यात आणि हिंसा पसरवण्याचा भारताचा प्रयत्न असतो असा आरोप बीएनपी पक्षाचे नेते करतात.  
 

Web Title: Bangladesh BNP associate bodies start long march towards Agartala India; India alert, border tension will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.