अहमदाबाद - एका स्थानिक बँकेला ग्राहकाच्या परवानगीशिवाय त्याच्या खात्याची माहिती त्याच्या पत्नीला देणं महागात पडलं आहे. बँकेला यासंबंधी दहा हजाराचा दंड भरावा लागला आहे. दिनेश पमनानीस असं ग्राहकाचं नाव असून ग्राहक तक्रार निवारण मंचाने संबंधित बँकेला ग्राहकाला दहा हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश दिला आहे.
दिनेश यांचे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या स्थानिक शाखेत खाते आहे. बँकेने कोणतीही सूचना न देता त्यांच्या खात्याची माहिती पत्नीला दिली. याबाबत दिेनेश यांना माहिती मिळताच त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती. 'पत्नीसोबतचा वाद फॅमिली कोर्टात सुरू आहे. अशा वेळी माझी पत्नी बँक खात्याद्वारे मिळालेली माहिती कोर्टात सादर करू शकते,' असं म्हणणं दिनेश यांनी मांडलं.
दिनेश यांना 6 मे 2017 रोजी बँकेकडून मोबाईलवर एक मेसेज पाठवण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या खात्यातून 103 रुपये कापण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. दोन दिवसांनी त्यांनी बँक अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यावेळी पत्नी हर्षिकाने तुमचं बँक स्टेटमेंट घेतल्याने शुल्क आकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे बँकेविरोधात दिनेश यांनी परवानगीशिवाय त्याच्या खात्याची माहिती पत्नीला दिल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली होती.