नवीदिल्ली : ट्रिपल तलाकला विराेध हा केवळ व्हाेट बॅंक शाबूत ठेवण्यासाठी केला जात आहे. ट्रिपल तलाक हटविण्याची काेणाच्यात हिम्मत हाेत नव्हती. परंतु माेदींनी ट्रिपल तलाक रद्द केला. यासाठी माेदींचे नाव इतिहासात समाजसुधारकांमध्ये घेतले जाईल असे वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. दिल्लीतील काॅन्स्टिट्युशनल क्लबमध्ये आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
शहा म्हणाले, ट्रिपल तलाक ही एक कुप्रथा हाेती. यावर आता कायदा झाल्याने मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळाला आहे. 16 मुस्लिम राष्टांनी देखील ट्रिपल तलाक हद्दपार केला आहे. आपल्याला 56 वर्षे लागली. यासाठी काॅंग्रेसचे मतांचे राजकारण कारणीभूत आहे. ट्रिपल तलाक रद्द करणे जर गैर इस्लामिक असते तर इतर इस्लामी राष्ट्रांनी ताे का हद्दपार केला असता.
पुढे बाेलताना शहा म्हणाले, पाच वर्षाच्या कार्यकाळात माेदी सरकारने 25 ऐतिहासिक निर्णय घेऊन देशाची दिशा बदलण्याचे काम केले. ही माेदींच्या नेतृत्वाची कमाल आहे. ट्रिपल तलाक रद्द करण्यात मुस्लिम जनतेचाच फायदा आहे. 50 टक्के मुस्लिम महिलांना या प्रथेचा त्रास सहन करावा लागत हाेता. आम्ही जर हे विधेयक संसदेत मांडलं नसतं तर हा भारतावरील सर्वात माेठा डाग असला असता. यासाठी मुस्लिम महिलांनी माेठा संघर्ष केला आहे. शहबानाेला ट्रिपल तलाक देण्यात आला तेव्हा ती सर्वाेच्च न्यायालयापर्यंत गेली. जे राजकारण काॅंग्रसने 60 च्या दशकानंतर सुरु केले त्याचे अनुसरण सर्वच राजकीय पक्षांनी केले. त्याचा परिणाम भारतीय लाेकशाही व सामजिक जीवनावर पडल्याचे दिसून येते. विकासाच्या वाटेत जाे मागे पडला आहे त्याला वरती आणण्याची गरज आहे. याने समाज सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक हाेईल.