श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला पोलिसांनी नौहट्टा परिसरातील एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा फोटो काश्मीर खो-यात असलेला तणाव निवळू लागल्याचे संकेत देत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर काश्मीर खो-यात कोणतीच समस्या नसून, सर्व काही शांतेतत सुरु असल्याचं दिसत आहे. या फोटोत जम्मू काश्मीर पोलिसातील जवान मुलासोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी जवानाने स्टम्प म्हणून आपलं सुरक्षाकवच उभं केलं आहे, आणि मुलगा फलंदाजी करत आहे. पोलीस जवान यावेळी स्टम्पच्या मागे विकेटकीपरच्या भुमिकेत आहे. दोघांकडे पाहिल्यानंतर आपल्याला कोणतीही चिंता नसून मुक्तपणे क्रिकेटचा आनंद घेत आहोत असंच ते सांगतायत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील हा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो पत्रकार बासित जरगार यांनी काढला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
बारामुल्ला पोलिसांच्या ट्विटवर एका व्यक्तीने मुलासोबत खेळणा-या जवानाचं नाव वसीम असल्याचं सांगितलं आहे. मिस्टर वसीम एक शूर पोलीस अधिकारी असल्याचं त्याने सांगितलं आहे. पत्रकार बासित जरगार यांनी ट्विटमध्ये हा फोटो नेमका कुठे काढला आहे याबद्दलही सांगितलं आहे. बासित यांनी सांगितल्यानुसार, पोलीस अधिकारी मुलासोबत क्रिकेट खेळत असलेलं हे ठिकाण जामिया मस्जिदबाहेरील आहे. हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा श्रीनगरमधील अनेक ठिकाणी 'गाव कादल नरसंहार'ला 28 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. 21 जानेवारी 1990 रोजी गाव कादल नरसंहार झाला होता, ज्यामध्ये जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाला होता. उपलब्ध माहितीनुसार, सुरक्षा जवानांनी रात्रीच्या वेळी शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी लोकांनी सुरक्षा जवानांविरोधात शोषण होत असल्याची तक्रार करत विरोध सुरु केला होता. यावेळी लोकांवर गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. यावेळी खो-यात नरसंहारनिमित्त कोणत्याही प्रकारचं निदर्शन होऊ नये यासाठी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.
दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर काश्मीर खो-यात तणाव वाढला होता. जवळपास 2 महिने कर्फ्यूसदृश्य परिस्थिती होती. यावेळी सुरक्षा जवानांना मोठ्या प्रमाणात दगडफेकीला सामोरं जावं लागलं होतं. काश्मीरमधील परिस्थितीमुळे राजकारणही चांगलंच तापलं होतं. अशा परिस्थितीत लहान मुलाचा क्रिकेट खेळतानाचा हा फोटो अनेकांना दिलासा देणारा ठरला आहे. सोशल मीडियावर फोटोचं तोंडभरुन कौतुक केलं जात आहे. एक युजरने क्रिकेट बॉल फेका, दगड नाही अशी कमेंट केली आहे.
पोलिसांनी फोटो शेअर करताना श्रीनगर, नौहट्टा आणि सुंदर फोटो असे हॅशटॅग दिले आहेत. आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. यापेक्षा सुंदर फोटो असू शकत नाही असंच पोलिसांचं म्हणणं आहे. फोटोमधील ही परिस्थिती काश्मीरमध्ये कायम व्हावी यासाठी सुरक्षा जवान दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत.