बसवेश्वरांची जयंतीही राजकीयच; भाजपा व काँग्रेसमध्ये चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:11 AM2018-04-19T01:11:23+5:302018-04-19T01:11:23+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपाची जोरदार धावपळ सुरू असून, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्यात मागे नाहीत.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते मिळवण्यासाठी काँग्रेस व भाजपाची जोरदार धावपळ सुरू असून, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही त्यात मागे नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा हे लिंगायत असले, तरी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म व धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देऊ न काँग्रेसने त्यांच्यापुढेच मोठे आव्हान निर्माण केले आहे.
लिंगायत समाजास स्वतंत्र धर्माची मान्यता देणे भाजपाला मान्य नाही. तो समाज हिंदू धर्माचा भाग आहे, अशीच भाजपाची भूमिका आहे, पण प्रत्यक्षात स्वतंत्र धर्माची मागणी लिंगायत समाजानेच केली होती. आता त्या विरोधात भूमिका घेतल्याने भाजपाची अडचण झाली आहे. लिंगायत समाजाचे प्रमाण १७ ते २0 टक्क्यांदरम्यान असून, त्यावर सर्वांचा डोळा आहे. आतापर्यंत ती भाजपाला मिळत होती, याचे कारण येडियुरप्पा. मात्र, स्वत: कुरबा समाजातील सिद्धरामय्या यांनी ती मते आपल्याकडे यावीत, या दृष्टीने पावले टाकली. विधानसभेत लिंगायत आमदारांची संख्या १00 हून अधिक असून, त्यापैकी ५0 काँग्रेसचे व तितकेच भाजपाचेही आहेत. एकूण २२८ आमदारांच्या विधानसभेत सर्वाधिक आमदार या समाजाचे असल्यानेच ती मते सर्वांना हवी आहेत.
तरुणांना अटक
लिंगायत व वीरशैव समाजाला धार्मिक अल्पसंख्य दर्जा देण्याबाबत भाजपाची भूमिका काय आहे, हे जाहीर करा, असे सांगण्यासाठी अमित शहा यांच्यापाशी जाऊ पाहणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. हे तरुण आज विधान भवनापाशी निघाले होते. बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यासाठी अमित शहा येणार असल्याने त्यांना जाब विचारण्याचे लिंगायत तरुणांनी ठरविले होते.