नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होऊन काहीच दिवस झाले असताना आता सर्वांची रोजची गरज असलेले साबण, डिटर्जंटच्या खरेदीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. हिंदुस्तान युनिलीव्हरने साबण आणि डिटर्जंट यांच्या किमतींमध्ये ३ टक्क्यांपासून २० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. इतर कंपन्याही आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत असल्याने ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.
हिंदुस्तान युनिलीव्हर लिमिटेडच्या व्हील, रिन, सर्फ एक्सेल आणि लाईफबॉय या उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनीने उत्पादनांच्या किमतीत वाढ केल्याचे म्हटले आहे. उत्पादन खर्चामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कंपनीने गेल्या वर्षीही उत्पादनांच्या किमतीत वाढ केली होती.
कंपनीने सर्फ एक्सेल साबणाच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. ती तब्बल २० टक्क्यांची आहे. याआधी साबणाच्या किमतीमध्ये २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. सध्या एक्सेल साबणाची किंमत १२ रुपये आहे. त्यात आणखी वाढ होणार असल्याने नागरिकांना साबण खरेदीसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत.
किती झाले महाग?रिन बार : १० वरून २० रुपयेलाईफबॉय १२५ ग्रॅम : २९ वरून ३१ रुपयेपिअर्स १२५ ग्रॅम : ७६ वरून ८३व्हील पावडर १ किलो : ६० वरून ६२ रुपये
इतर कंपन्याही करणार दरात वाढ
अखिल भारतीय ग्राहक उत्पादने वितरक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी म्हटले की, उत्पादन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे सध्या हिंदुस्तान युनिलीव्हरने आपल्या उत्पदनांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. इतरही कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत. सध्याच्या स्थितीत किमती वाढल्याने वापरावर परिणाम होणार असून, महागाई वाढेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.