बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवारी जाहीर होणार आहे. आजवर महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता होती. ही सत्ता कायम राखण्यासाठी मतदारांनी कौल दिला आहे. त्यामुळे 58 प्रभागातील 385 उमेदवारांपैकी मतदारांनी कुणाला आपला नगरसेवक म्हणून निवडले आहे? यावर आज दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होणार आहे. नगरसेवक पदाच्या विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरु झाली आहे. या निकालात महाराष्ट्र एकीकरण समितीने खाते उघडले आहे. वॉर्ड नंबर 14 मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिवाजी मंडूळकर विजयी आहेत. तर आतापर्यंत भाजपचे 6, काँग्रेसचे 4, अपक्ष 3 आणि एमआयएमचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 58 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. मतमोजणी केंद्रात पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. शहरात मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात 1500 पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत 50.41 टक्के मतदान झाले. 1,13,396 पुरुष तर 1,03,764 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती. दरम्यान, राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.